काही प्रकल्प अनेक वर्षापासून सुरु याचे दु:ख अधिकारी कर्मचाऱ्यांना नाही : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
अमजद खान, कल्याण
चार तास बैठक घेतली. पण काही प्रकल्प अनेक वर्षापासून सुरु आहेत. दु:ख या बाबतीचे आहे. ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी या बैठकीत आपले मत मांडले आहे त्यानुसार व्यवस्थीत आणि कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे असे विधान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. तसेच दोन महिन्यानंतर मी पुन्हा येऊन या सगळ्याचा आढावा घेणार त्यात किती प्रगती झाली हे पाहणार असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
मंत्री ठाकूर हे कल्याण डोंबिवलीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल डोंबिवलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद केला. त्यानंतर त्यांनी कल्याणमध्येही बैठक घेऊन संवाद साधला. सायंकाळी महापालिका मुख्यालयातील स्मार्ट सिटी कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्प सुरु असताना रस्त्यावरील खड्डयांविषयी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामाविषयी असमाधान व्यक्त केले. त्यांनी आयुक्तांना खडे बोल सुनावले. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या सभागृहात चार तास जंबो बैठक घेतली.
या बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा आमदार गणपत गायकवाड भाजप आमदार किसन कथोरे आमदार संजय केळकर जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या दोन महापालिका आणि एका पालिकेच्या हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना पुढे कसं काम करायचे याबद्दल सूचनाही दिल्या.