तर 'तो' उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, भाजपच्या माजी खासदाराकडून फडणवीसांचा एकेरी उल्लेख
सोलापूर : पंढरपूर कॅरिडॉरवरून स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे. तरीदेखील त्यावर ठाम असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख केला आहे.
पंढरपूर कॅरिडॉरवरून भाजपमध्येच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला आहे की, कोणीही मध्ये आलं तरी तिरुपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपुरचं कॉरिडॉर होणारच. फडणवीसांच्या या भूमिकेवर भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी एकेरी उल्लेख करत म्हटलंय की, मी आव्हान देऊन सांगतो की, पंढरपूर कॅरिडॉर होणार नाही आणि तो जास्त बोलला तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाही, असं म्हणत फडणवीसांना एक प्रकारे इशाराचं दिला आहे.
स्वामी यांनीही भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांप्रमाणं या कॉरिडॉरला विरोध करत या कॉरिडॉरऐवजी पंढरपूरमधील इतर कामांना आणि कनेक्टीव्हीटीला प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. स्वामी सोलापूर दौऱ्यावर असताना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील कॉरिडॉरच्या मुद्द्यावरुन स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलंच तापलंय. वाराणसी आणि तिरूपतीच्या धर्तीवर तीर्थक्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 2030 कोटी 70 लाख रूपये खर्चाचा विकास आराखडा तयार केलाय. दुसरीकडं हा कॉरिडॉर रद्द व्हावा या मागणीसाठी पंढरपुरात सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. हा कॉरिडॉर रद्द न झाल्यास स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिलाय.
काही स्थानिक कॉरिडॉरच्या मुद्यावर पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची आणि पुढच्या वर्षी आषाढी यात्रेत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेसाठी आमंत्रित करण्याचा इशारा देत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॉरिडॉरबाबत ठाम असून काहीही झालं तरी हा कॉरिडॉर होणारच, असं सांगत आहेत. फडणवीसांवर टीका करताना फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असा इशारा भाजपचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी देत आहेत. त्यामुळं भविष्यात पंढरपूर कॅरिडॉरचा मुद्दा पेटणार आहे.