सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने घेतली पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट
प्रसाद पाताडे | सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील बंद करण्यात आलेले चेक पोस्ट पुन्हा कार्यरत करण्याचे संकेत नूतन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी बुधवारी दिले. चेकपोस्ट नसल्याने अवैध धंद्यांना वचक राहिला नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी यांचे नियोजन करून चेक पोस्ट सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ओरोस मुख्यालय पत्रकार संघाने घेतलेल्या भेटी दरम्यान दिली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर प्रथमच मुख्यालय पत्रकार संघाने सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ओरोस मुख्यालय पत्रकार संघ अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपकर, सचिव देवयानी वरसकर, मुख्यालय सचिव मनोज वारंग, नंदकुमार आयरे, विनोद दळवी, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर, प्रसाद पाताडे, विनोद परब, गुरुप्रसाद दळवी आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्याशी पत्रकारांनी जिल्ह्यातील क्राईम बाबत चर्चा केली. क्राईमची जिल्ह्यात असलेल्या स्थितीबाबत माहिती अग्रवाल यांनी जाणून घेतली. यावेळी अग्रवाल यांनी, "आपण सध्या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देत आहे. यातून जिल्हा समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर कोणत्या पोलीस ठाण्यात क्राईम जास्त आहे. कोणत्या प्रकारचा क्राईम जास्त आहे ? याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात येणार आहे, असे अग्रवाल म्हणाले आहे.
मनुष्यबळ, वाहनांची कमतरता
जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर आपण उपलब्ध यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी आवश्यक मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचा काहीसा परिणाम कामकाजावर होत असल्याचे मान्य करीत एस पी अग्रवाल यांनी असलेल्या यंत्रणेतून जिल्ह्यातील क्राईम रोखण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत.
गुन्ह्याची उकल हाच क्राईम रोखण्याचा मार्ग
जिल्ह्यात होत असलेल्या चोऱ्या, उफाळलेल्या अवैध धंदा तसेच गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटण्याचे घडलेले प्रकार याकडे यावेळी पत्रकारांनी अग्रवाल यांचे लक्ष वेधले. यावर बोलताना पुढील क्राईम सभेत आपण जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेशी याबाबत चर्चा करणार आहे. मात्र, गुन्हे रोखण्यासाठी घडलेल्या गुन्ह्याची उकल करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगत आपल्या काळात गुन्ह्यांतील आरोपींना जेरबंद करण्यावर भर राहणार असल्याचा इरादा स्पष्ट केला.
मिडीयाशी कनेक्ट राहणार
मागील काही कालावधी जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलीस यंत्रणेकडून दिली जात नव्हती. दिली आली तर ती उशिराने दिली जात होती. याबाबत पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर बोलताना एफ आय आर मध्ये नोंद झालेली माहिती देण्यास कोणतीही अडचण नाही. कारण ती माहिती सार्वजनिक असते. त्यामुळे आपल्याकडून तसे होणार नाही. घडलेल्या गुन्ह्याची माहिती वेळेत दिली जाईल. तसेच मीडिया पासून कोणतीही माहिती लपविली जाणार नाही, अशीही ग्वाही अग्रवाल यांनी यावेळी दिली.