राज्यात 50 हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रंगत वाढत आहे. महायुती आणि मविआकडून प्रचारसभांसाठी स्टार प्रचारकांना मैदानात उतरवले जात आहे. मात्र, यावेळी एक वेगळीच चिंता सत्ताधारी आणि विरोधकांना सतावत आहे. या विधानसभा निवडणुकीतही २८८ पैकी ५० हून अधिक मतदारसंघात नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात ५० हून अधिक मतदारसंघांत असे नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभे राहिले असून त्यांची नावेही जयंत पाटील, मंदा म्हात्रे, नवाब मलिक अशी प्रमुख उमेदवारांशी मिळतीजुळती असल्याने प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना मात्र मतविभाजनाची भीती सतावत आहे.
थोडक्यात
मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता
५० हून अधिक मतदारसंघांत नामसाधर्म्य असलेले उमेदवार
जयंत पाटील, मंदा म्हात्रे, नवाब मलिक अशी प्रमुख उमेदवारांशी मिळतीजुळती असल्याने प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना मात्र मतविभाजनाची भीती
नामसाधर्म्य असलेला उमेदवार उभा करण्याचा काय आहे इतिहास?
रायगडमधील मतदारसंघांत सर्वात आधी नामसाधर्म्य असलेले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्यास साधारण १९९०पासून सुरुवात झाली. तोच कित्ता आता राज्यातील अनेक मतदारसंघात गिरवला जात आहे.
कोणकोणत्या उमेदवारांचे नामसाधर्म्य असणारे उमेदवार रिंगणात?
मुंबईतील चांदिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे हे निवडणूक लढवत आहेत. येथे दिलीप लांडे नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक हे अधिकृत उमेदवार असून येथेही नवाब मलिक नावाचे अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
वांद्रे पूर्वमध्ये अजित पवार गटाचे झिशान सिद्दिकी या अधिकृत उमेदवाराच्या नावाशी साम्य असलेले झिशान सिद्दिकी अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
नवी मुंबईत बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक यांच्यात मुख्य लढत आहे. येथेही मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक या दोघांचेही नामसाधर्म्य असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राजेश वानखेडे यांच्या नावाशी साम्य असलेले राजेश वानखेडे अपक्ष उभे आहेत, अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांच्याच नावाचे तीन अपक्ष उमेदवार उभे आहेत.
कर्जतमध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे आणि उरणमध्ये ठाकरे गटाच्या मनोहर भोईर यांच्या नावाचे तर रत्नागिरीतील दापोली मतदारसंघात शिंदे गटाच्या योगेश रामदास कदम या नावाशी तंतोतंत साम्य सांगणारा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. याव्यतिरिक्त योगेश कदम नावाचा आणखी एक उमेदवारही आहे.
ठाकरे गटाच्या संजय वसंत कदम यांच्या नावाशी साम्य असलेले दोन उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. चिपळूणमध्ये अजित पवार गटाचे शेखर निकम आणि शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्या नावाशी साम्य असलेले उमेदवार आहेत.