Sidhu Moosewala हत्या प्रकरणाचे पुणे कनेक्शन; दोन आरोपींना लूकआऊट नोटीस
अमोल धर्माधिकारी | पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moosewala) अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी (Police) पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. तर तिहार तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचीही (Lawrence Bishnoi) पोलीस कसून चौकशी करत आहेत. यादरम्यानच एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आले आहे.
पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवालाची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर येत असून दोन जणांना लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. सौरभ महांकाळ, संतोष जाधव अशी आरोपींचे नावे आहेत. हे दोघेही जण लॉरेन्स बिष्णोई यांच्या टोळीतील असल्याचे समजत आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज पाहून संतोष जाधव याच्याबद्दल माहिती दिली होती.
दरम्यान, सिद्धू मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. यातील तीन शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातील, 2 हरियाणा आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होते, अशी माहिती समोर येत आहे.
सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी संबंधित असलेल्या लॉरेन्स बिष्णोईने आता या प्रकरणाची धास्ती घेतल्याची माहिती समोर येते. बिष्णोईने आता पट्याला न्यायालयात याचिका दाखल केली असून पंजाब पोलिसांकडून आपला फेक एन्काऊंटर होऊ शकतो, अशी भीती त्यानं व्यक्त केली आहे.