अमृतसरमध्ये चार तास चाललेल्या चकमकीत सिद्धू मुसेवाला हत्येतील दोन संशयीत ठार
अमृतसर : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आणि पंजाब पोलिसांची मंगळवारी मोठी चकमक झाली. अमृतसरजवळील एका गावात चार तास चाललेल्या चकमकीत जगरूप रूपा आणि मनप्रीत उर्फ मन्नू हे दोन गुंड ठार झाले आहेत. या चकमकीत तीन पोलीस जखमी झाले असून, दोन शूटर्सला पोलिसांनी कंठस्नान घातलं आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, जगरूप रूपा हा चकमकीत मारला गेला, तर दुसरा संशयित मनप्रीत सिंग सुमारे एक तास पोलिसांवर गोळीबार करत राहिला. सुमारे चार तासांच्या या चकमकीनंतर तो देखील ठार झाला. अमृतसरच्या भकना कलानौर गावात ही चकमक झाली. क्रॉस फायरिंगमध्ये एका चॅनलच्या कॅमेरा पर्सनलाही उजव्या पायाला गोळी लागली आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव हे देखील अमृतसरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या भकना गावात चकमकीच्या ठिकाणी पोहोचले होते. पंजाब पोलिसांच्या अँटी-गँगस्टर टास्क फोर्सचे प्रमुख असलेले एडीजीपी प्रमोद बेन यांनी सांगितलं की, AK- 47 आणि विदेशी पिस्तुलाव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात काडतुसं आणि मॅगझिन गुंडांकडून जप्त करण्यात आले आहेत. असंही सांगितलं जातंय की, मनप्रीत हा शूटर असून, सर्वात आधी त्याच्याकडून मुसेवाला यांच्यावर AK47 मधून पहिली गोळी झाडण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनडात असलेल्या गोल्डी ब्रार या गुंडाने मनप्रीतला मूसेवालावर पहिली गोळी झाडेल, असा आदेश दिला होता. खरं तर मनप्रीतला पंजाबमधील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, तेव्हा पटियाला गँगच्या सदस्यांनी त्याला तुरुंगातच बूट आणि चप्पलने मारहाण केली होती. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल केला होता. यामुळे पटियाला टोळीला धडा शिकवण्यासाठी आणि बदला घेण्यासाठी मनप्रीतने गोल्डी ब्रारला पहिली गोळी चालवण्यास सांगितलं होती. या दोघांशिवाय तिसरा दीपक मुंडी हा देखील फरार आहे.