Shyam Manav: श्याम मानव यांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर हल्लाबोल; म्हणाले, "त्यांची राजकीय..."
Shyam Manav On Chandrashekhar Bawankule : महाविकास आघाडीने तुमच्यासारखे ६८-७० टक्के लोक जहरी टीका करण्यासाठी सोडले आहेत, जेणेकरुन समाजात तेढ निर्माण व्हावं आणि महाराष्ट्र ५० वर्षे मागे जावा, अशी टीका च्रंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर देताना अनिसचे संस्थावर श्याम मानव म्हणाले, भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार. त्यांची राजकीय संस्कृती काय आहे, हे त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्रात दिर्घकाळ सामजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत. जहरी टीका करण्यासाठी किंवा कुणाच्यातरी सांगण्यावरून आम्ही काम करत आहोत, असं त्यांना कुणी सांगितलं असेल, तर याचा अर्थ असा होतो की, त्यांचं महाराष्ट्रातल्या समाज जीवनाविषयीचं त्यांचं आकलन अतिशय ग्रेट आहे. म्हणूनच ते या स्टेजपर्यंत पोहोचणार आहेत.
प्रत्यक्षात हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर, संत नामदेवांपासून चालत आलेल्या वारकरी संप्रदायाच्या समतेच्या मार्गाचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही या पद्धतीची समता प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आपण शिवाजी महाराजांना एव्हढं मानतो. त्यानंतर शाहू-फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, आगरकर या सर्व मंडळींनी या महाराष्ट्राला पुरोगामी बनवलं आहे.
तुम्ही कोणत्याही जाती-धर्मात जन्माला आला, तरीही तुम्ही समान आहात. माणूस म्हणून तुम्हाला सन्मान आहे. या पद्धतीची वर्तणूक, या पद्धतीचा सन्मान देणे याला खऱ्या अर्थाने पुरोगामित्व म्हटलं जातं. महाराष्ट्रातल्या पुरोगामी कार्यकर्त्यांबद्दल तुम्ही या पद्धतीने व्यक्त होत असाल, तर यातून तुमची संस्कृती दिसून येते, असंही श्याम मानव म्हणाले.
एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली, तर त्याचे पुरावे पहावे. त्यावर किती विश्वास ठेवावा, हे मला माहित आहे. मी खोटं बोलत नाही, खोटी मांडणी करत नाही. हे मी पाहिल्यादा बोललो नाही. हे मी ३४ सभांमध्ये मागील काही दिवसांपासून बोलत आहे. मला कुणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोललो, असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मला विकत घेण्याची क्षमता आहे की नाही, मला कुणी विकत घेऊ शकतं का? हे फडणवीसांना चांगलं माहित आहे, असंही श्याम मानव म्हणाले होते.