"मला कुणी विकत घेऊ शकतं का? फडणवीसांना...", श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलं प्रत्युत्तर
Shyam Manav On Devendra Fadnavis: ईडी आणि इतर यंत्रणांनी अनिल देशमुखांवर दबाव आणून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं विधान अनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी केलं होतं. "श्याम मानव यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवं होतं. पण इको सिस्टममध्ये अलीकडच्या काळात सुपारीबाज लोक घुसले आहेत. सुपारी घेऊन बोलणारी लोकं घुसली आहेत. दुर्दैवाने त्यांच्या श्याम मानव त्यांच्या नादी लागले का?" असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंनिसचे संस्थापक शाम मानव यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर श्याम मानव यांनी माध्यमांशी बोलताना फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
श्याम मानव माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?
एखाद्या व्यक्तीने कुठली गोष्ट सांगितली, तर त्याचे पुरावे पहावे. त्यावर किती विश्वास ठेवावा, हे मला माहित आहे. मी खोटं बोलत नाही, खोटी मांडणी करत नाही. हे मी पाहिल्यादा बोललो नाही. हे मी ३४ सभांमध्ये मागील काही दिवसांपासून बोलत आहे. मला कुणीतरी सुपारी दिली आणि त्यानंतर मी बोललो, असं देवेंद्र फडणवीस यांना म्हणायचं आहे का? मला विकत घेण्याची क्षमता आहे की नाही, मला कुणी विकत घेऊ शकतं का? हे फडणवीसांना चांगलं माहित आहे.
आणीबाणीत इंदिरा गांधींचा विरोध केला होता. त्यावेळी संघाचे लोक तसेच देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्या सोबतही काम केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मी विचार करून बोललो. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे.लोकसभेत जनजागृती केली, विधानसभेत जनजागृती करेन.
देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी तीन वर्षे तासंतास वाट पाहली आहे. ते सहज भेटतात का? असा सवालही शाम मानव यांनी उपस्थित केला. शाम मानव अनिल देशमुखांवर बोलताना म्हणाले, अनिल देशमुख यांच्याकडे असलेल्या पुराव्याबद्दल खात्री असल्यामुळे बोललो आहे. सरकारवर गंभीर आरोप करताना खात्री पटल्यानं मी बोललो, असंही श्याम मानव म्हणाले.