नवरात्र उत्सवानिमित्त कुरकुंभला श्री फिरंगाईमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
विनोद गायकवाड|दौंड: कुरकुंभ(ता.दौंड) येथील ग्रामदैवत श्री फिरंगाईमाता देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवानिमित्त लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती.रांगेत आणि शिस्तीत भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान, भाविक भक्तांच्या गर्दीने कुरकुंभचा परिसर गजबजून गेला होता.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता मंदिरात नवरात्र उत्सव निमित्त दरवर्षी मोठी गर्दी पहावयास मिळते. राज्याच्या काना-कोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात..कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून हा उत्सव बंद होता. त्यामुळे यंदा हा नवरात्र उत्सवानिमित्त मागील सहा दिवसांपासून श्री फिरंगाईमाता देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविका येत आहेत. रविवारी (दि.२) सातवी माळ असल्याने आणि ह्या माळेला मोठे महत्व असल्याने श्री फिरंगाईमाता मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. दुपारनंतर गर्दी मोठ्या संख्येने वाढत गेली. दुपारी देवीची पालखीची मिरवणूक निघाल्याने दर्शनासाठी गर्दी उसळली होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. दौंड तालुक्यासह इतर तालुक्यामधील मोठ्या संख्येने भावीक दर्शनासाठी येत असल्याचे चित्र होते.
नवरात्र उत्सव कमिटी, श्रीफिरंगाई देवी देवस्थान ट्रस्ट, गावकरी,मानकरी,सेवेकरी, पुजारी,पोलीसांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात श्रीफळ, पेढे व इतर पूजेचे साहित्यांची दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळणी व इतर व्यवसायकांची दुकानासमोर वस्तू खरेदी करण्यासाठी भाविकांची गर्दी होती. गर्दीने कुरकुंभचा परिसर फुलून गेला आहे. दौंड व कुरकुंभ पोलीसांचा मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.