Shravan Somvar 2022 : परळीतील प्रभू वैजनाथ मंदिरात भाविकांची मांदियाळी
विकास माने, बीड
आज श्रावणातला पहिला सोमवार आणि याच निमित्त शिवालय भाविकांनी गजबजून गेली आहेत. बीडच्या परळी येथील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले वैजनाथ मंदिर भाविकांसाठी सकाळी पाच वाजता खुले करण्यात आले. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे भाविकांना दर्शन घेता आलं नाही. यंदा मात्र निर्बंध पूर्णपणे उठवले गेल्याने भाविकांची मांदियाळी शिवालयात पाहायला मिळतेय.
श्रावणानिमित्त वैजनाथ मंदिर परिसर उजळून निघालाय राज्यच नाही तर देशाच्या विविध भागातून भावीक या ठिकाणी आले आहेत. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. तर 75 सीसीटीव्ही कॅमेरे द्वारे मंदिर परिसरात नजर ठेवण्यात आलीय.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे,असे सांगितले जाते . पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते.