आफताब माझे तुकडे करेल, श्रद्धाने दोन वर्षांपुर्वीच केली होती तक्रार; पण एक चूक ठरली जीवघेणी
मुंबई : श्रध्दा वालकर प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने तिचा खून होण्याची भीती व्यक्त केली होती. आफताब दररोज मला मारहाण करत असून तो माझी हत्या करून माझ्या शरीराचे तुकडे करून फेकून देईल, अशी लेखी तक्रार श्रद्धाने २३ नोव्हेंबर २०२० रोजी नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात केली होती. श्रद्धाची ही भीती खरी ठरली आहे. मात्र, पोलिसांनी आफताबवर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच श्रद्धाने तिची तक्रार मागे घेतली होती. आणि तिची हीच चूक जीवघेणी ठरली.
श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी आफताबविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तिने आफताब मागील सहा महिन्यापासून मारहाण करत असून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीराचे तुकडे करून फेकून देईल, असे लिहीले होते. याबाबत आफताबच्या कुटुंबाला सुद्धा माहिती असल्याचे तिने खुलासा केला आहे. श्रद्धाने आफताब आणि ती लवकरच लग्न करणार असल्याचे सुद्धा सांगितले आहे.
आपल्या जिवाला धोका असल्याचे श्रद्धाने आपल्या तक्रारीत आफताबला सांगितले होते. एवढेच नाही तर आफताबने तिच्या शरीराचे तुकडे करण्याची धमकी दिल्याचा दावा श्रद्धाने केला आहे. श्रद्धाने मुंबईतील तुळींज पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली होती. श्रद्धाने पुढे लिहिले की, आता मला त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नाही. तो मला ब्लॅकमेल करतो, त्यामुळे मला काही झाले तर त्याला तो जबाबदार असेल. तो माझ्याशी भांडतो, असेही तिने सांगितले होते. पोलिसांकडे तक्रार आल्यानंतर तपास सुरू करण्यात आल्याचे डीसीपी सुहास भावचे यांनी सांगितले. पण, श्रध्दाने तक्रार मागे घेतली.
आफताब श्रद्धाला (२७) सतत मारहाण करत असे आणि त्याआधीही त्याने मे २०२० मध्ये नाराज होऊन आपल्या दोन मित्रांकडे मदत मागितली होती. श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, आफताबने श्रद्धाला 14 पेक्षा जास्त वेळा मारहाण केली होती. तिने आफताबवर खूप विश्वास ठेवायला सुरुवात केली होती. ते म्हणाले की, आफताबने तिला घाबरवले असावे. त्यामुळेच तिने आफताबविरुद्धची तक्रार मागे घेतली असावी. यापूर्वीही श्रद्धा कधी कधी तिच्या आईला फोन आफताब तिला मारहाण करण्याबद्दल सांगायची. पण, त्याच दरम्यान तिच्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर श्रद्धाने वडिलांना एक-दोनदा फोन केला. तेव्हाही त्याने आफताबच्या कृत्याबद्दल सांगितले. घरी आल्यानंतर तिनेही तेच सांगितले. यावर वडिलांनी आफताबला घरी सोडण्यास सांगितले होते. पण, आफताबच्या समजवल्याने श्रद्धा त्याच्यासोबत गेली होती.