संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी तहसीलदारांसह एकास कारणे दाखवा नोटीस
तुळजापुर : तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांचा अवमान केल्या प्रकरणी तहसीलदार योगिता कोल्हे व सहायक धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बजावलेल्या नोटीशीप्रमाणे दोघांनाही तुमच्यावर प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये ? असे विचारण्यात आले आहेत. संभाजी छत्रपतींच्या अवमान प्रकरणी कारवाई साठी तुळजापूरकरांनी (Tuljapur) काल शहर बंद ठेवलं होतं.
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त झाले होते. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी राजेंना अडविले अशी माहिती समोर आली आहे. यावेळी संभाजी महाराज यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्ध गाभाऱ्यात सोडलं नाही, त्यामुळे महाराज संतप्त झाल्याचं एका व्हिडिओमधून समर आलं होतं. छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ दिलं नाही, त्यानंतर त्यांचे समर्थक देखील आक्रमक झाले होते. महाराज स्वत: बाहेर येत असताना त्यांनी राग व्यक्त करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शेकडो वर्षांची ही परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज झाल्याचं त्यामधून दिसून आलं होतं.तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली असली तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी, तहसीलदार, व्यवस्थापक यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम आहेत.