Wardha: वर्ध्यात धक्कादायक घटना! जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
भूपेश बारंगे| वर्धा : वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नरसिंगपूर येथील वृद्ध पशुपालक जनावरे घेऊन चारण्यासाठी जंगलात गेला असता अस्वलीच्या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
मृतक व्यक्तीचे नाव गोमाजी मानकर आहे तर त्याचे वय 65 आहे. अस्वलाच्या हल्ल्यात ठार झालेले गोमाजी मानकर हा स्वतःचे जनावरे चारण्यासाठी जंगलात गेला होता. यावेळी त्यांच्या अंगावर अचानक अस्वलाने हल्ला केला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पशुपालक गोमाजी मानकर यांचे जंगलात घेऊन गेलेले जनावरे घरी परतले. मात्र गोमाजी मानकर घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते सापडले नाही. आज पुन्हा त्यांचा भर पावसात शोध घेतला असता आज त्यांचा जंगलात मृतदेह आढळून आला. त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.यावेळी घटनास्थळी तळेगाव (श्यामजीपंथ) वनपरिक्षेत्र अधिकारी, कारंजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, लीलाधर उकंडे, खुशाल चाफले घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तत्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. वृत्तलीहेपर्यंत मृतदेहावर शवविच्छेदन केले नव्हते.
भर पावसात पाच किलोमीटर अंतरावरून आणले मृतदेह
आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाच्या दिवसात जंगलात वाहन जात नाही. यामुळे चक्क मृतदेह हे उचलून आणावे लागले. यावेळी गावातील नागरिकांची मदत घेऊन मृतदेहाला जंगलाच्या बाहेर आणण्यात आले. पावसाच्या दिवसात जंगलातून मृतदेहाला आणणे हे कठीणच होते मात्र चिखल तुडवत मृतदेहाला जंगलाच्या बाहेर आणल्याचे स्थानिक सांगत होते.
वाघ, बिबट आता अस्वलाच्या हल्ल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
कारंजा तालुक्याला जंगल परिसर लागून असल्याने येथे वाघ, बिबट, अस्वल असे हिंसक प्राण्यांचे दर्शन भरदिवसा होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. अशातच आज अस्वलाच्या हल्ल्यात पशुपालकाचे मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. जुनापाणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार झाल्याची नुकतीच घटना घडली आहे. रात्रीला शेतात रखवालीसाठी शेतकऱ्यानी जाणे बंद केल्याचे शेतकरी सांगत होते.