पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरेंची धडपड; 'धनुष्यबाण' थेट निवडणूक आयोगात
एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेची सत्ता तर गेलीच, मात्र पक्ष वाचवण्याचं आव्हान देखील सध्या उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर उद्धव ठाकरे सध्या पक्ष आणि संघटना टिकवण्यासाठी धडपडत करत आहेत. दरम्यान, त्यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) जाऊन कॅव्हेट दाखल केलं आहे. त्यात पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत कोणताही निर्णय त्यांची बाजू ऐकून घेऊनच घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने केली आहे. शिवसेनेचे 55 आमदार असून, त्यापैकी 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय 19 लोकसभा खासदारांपैकी अनेक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गट निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्ष आणि चिन्हावर दावा करु शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी उद्धव ठाकरे आधीच सक्रिय झाले असून, त्यांनी निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केलं आहे. 'शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय घेऊ नये', अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने कॅव्हेटमध्ये केली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर शिंदे गट दावा करू शकतो. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी ही खबरदारी घेत निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्याचं बोललं जातंय.
नगरसेवकांमध्येही पडली फूट एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ 40 आमदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेनेच्या संसदीय पक्षातही फूट पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील काही नगरसेवक आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देताना दिसताहेत. अलीकडेच ठाण्यातील शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. बंडखोर आमदार हीच खरी शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा असून, ते बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पुढे नेत असल्याचं त्यांचं मत आहे.