सरकार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला का घाबरले? हा डरपोकपणाच; सामनातून हल्लाबोल

सरकार ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ला का घाबरले? हा डरपोकपणाच; सामनातून हल्लाबोल

फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुरस्काराला राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण वाड्मय (अनुवाद) हा जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. या पुरस्काराची निवड समितीही रद्द करण्यात आली आहे. राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले होते. १ लाख रुपये आणि ५० हजार रुपये अशा दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.'फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन' या पुस्तकाला देण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने हा पुरस्कार आता रद्द केल्याचे जाहीर केले. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचा अग्रलेख सामनातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. “या देशातील कोटय़वधी दलित, आदिवासींनी अद्यापि स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी जंगलात लढणारे, पोलिसी अत्याचाराविरुद्ध संघर्ष करणारे शेवटी माओवादी किंवा नक्षलवादी ठरवून मारले जातात. माओवाद या लोकांना चीनकडून मिळाला असेल, तर लडाख, अरुणाचलात जो माओवादी चीन घुसला आहे, त्याचे आमच्या सैन्यावर जे हल्ले सुरू आहेत त्या माओवादाचा अंत सरकार कधी करणार? त्या माओवादाशी न लढणारे राज्यकर्ते कोबाड गांधींच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार रद्दबातल ठरवून छाती फुगवतात तेव्हा आश्चर्य वाटते” असे सामनातून म्हटले आहे.

“या प्रकारानंतर स्वतंत्र बाण्याच्या अनेक लेखकांनी निषेध म्हणून ‘पुरस्कार वापसी’ सुरू केली आहे. सरकारच्या हस्तक्षेपाचा निषेध म्हणून डॉ. प्रज्ञा पवार, नीरजा आणि हेरंब कुलकर्णी या तिघांनी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा राजीनामा दिला आहे. आता राज्याचे घटनाबाहय़ सरकार म्हणेल, ‘‘या तिघांनी राजीनामा दिल्याने काय बिघडले? ते तर आमच्या विचारांचे नव्हते. आता रिकाम्या जागी आमच्या विचारांचे लोक चिकटवून टाकू.’’ प्रश्न इतकाच आहे की, या सरकारचा विचार नक्की कोणता?” असा सवाल सामनातून सरकारला विचारण्यात आला आहे.

यासोबतच “देशातले सध्याचे स्वातंत्र्य हेदेखील तसे ‘फ्रॅक्चर्ड’ म्हणजे जखमी, विकलांगच झाले आहे. कोबाडनी त्यावरच भाष्य केले. सरकार त्यांना का घाबरले? पुस्तकाच्या अनुवादास दिलेला पुरस्कार परत घेणे हा डरपोकपणाच आहे. कुठलीही हुकूमशाही डरपोकपणाच्या पायावरच उभी राहते. आज महाराष्ट्रात तेच चित्र आहे. “कोबाड गांधी हे माओवादी विचारक होते. त्यांचे अनेक विचार पटतीलच असे नाही. त्यांचे नक्षलवादी चळवळींशी संबंध होते. त्याबद्दल ते तुरुंगात होते. तुरुंगातील आपल्या अनुभवांवर त्यांनी टिपणे लिहिली व ती इंग्रजीत पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. या पुस्तकात त्यांनी भरकटलेल्या माओवादावरही टीका केली. असे म्हणत सामनातून सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com