“मोदी सरकारची बोटेच छाटली व ते दुखरे हात…; शिवसेनेचा मोदींवर हल्लाबोल
अदाणी समूह प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. याच प्रकरणी आता राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाने नोटीस बजावली आहेलोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि वर्तणूक शाखेच्या उपसचिवानं राहुल गांधींना ईमेलवर नोटीस दिलं आहे. लोकसभा सचिवालयानं राहुल गांधींना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. राहुल गांधींनी ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत केलेल्या भाषणाने भाजपाचा चेहरा संसदेत पिवळा पडला होता. या भाषणात राहुल गांधींनी जे प्रश्न उद्योगपती अदानी-मोदी संबंधांबाबत निर्माण केले, त्यावर उत्तर देण्याचे टाळून पंतप्रधान मोदी फक्त ‘इधर उधर की बाते’ करीत राहिले. गेली सात-आठ वर्षे राहुल गांधी हे भाजपाच्या खिजगणतीत नव्हते. आता त्यांनी ‘राहुल’नामाचा धसकाच घेतला आहे. ७ फेब्रुवारीच्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारची बोटेच छाटली व ते दुखरे हात तोंडावर ठेवून भाजपावाले बोंबा मारीत आहेत. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच अदानी-मोदी’ प्रकरणात देशाची नाचक्कीच झाली आहे. पण, भाजपा त्याबाबत डोळ्यांवर पट्टी व तोंडावर बोट ठेवून आहे. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतरच अदानी हे श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले. ‘‘फक्त एकाच उद्योगपतीच्या पाठीशी पंतप्रधान संपूर्ण ताकद कशी काय लावू शकतात?’’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. हा पंतप्रधानांच्या अवमानाचा विषय कसा होऊ शकतो? असे म्हणत सामनातून मोदींना टोला लगावण्यात आला आहे.
यासोबतच मोदी हे हजरजबाबी आहेत. मोठमोठ्या सभा, आंतरराष्ट्रीय मंच ते गाजवून सोडतात. मग स्वतःच्या लोकसभेत अत्यंत किरकोळ वाटणाऱ्या राहुल गांधींच्या प्रश्नांना ते उत्तर का देऊ शकले नाहीत? आणि आता प्रश्नकर्त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यालाच हुकूमशाही म्हणतात. हा डरपोकपणासुद्धा आहेच. आपण एकटे विरोधकांना भारी पडलो आहोत असे पंतप्रधान गरजले, पण प्रत्यक्षात एकटे राहुल गांधी ७ फेब्रुवारी रोजी मोदी व त्यांच्या सरकारला भारी पडले हे आता स्पष्ट झाले. असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.