राज ठाकरे दिल्लीला रवाना, आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान, म्हणाले,"राजसाहेबांनी ठरवलं तर..."
राज ठाकरे आणि आमची विचारसरणी सारखीच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीतच असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मनसे महायुतीत सामील होणार, हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, राजसाहेबांनी ठरवलं तर केल्याशिवाय राहत नाही, असा आमचा अनुभव आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट म्हणाले, गेल्यावेळी राज ठाकरे शिंदे साहेबांना भेटले होते, तेव्हा शिंदे साहेब उघडपणे बोलले होते की, राजसाहेबांनी महायुतीत यावं, या गोष्टीला आता सुरुवात होत आहे. आज दिल्लीला गेले आहेत, निश्चितच सकारात्मक निर्णय होईल. राज साहेबांच्या महायुतीत येण्यानं शिंदे आणि फडणवीस यांनी मोदींना ४५ पारचा विश्वास दाखवला आहे, तो आकडा गाठण्यात अडचणी निर्माण होणार नाही. राज ठाकरेंनी युतीत यावं, त्याचं स्वागतच आहे. राजसाहेब आहेत, त्यांनी ठरवलं, तर केल्याशिवाय राहत नाही, हा आमचा अनुभव आहे.
लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यापासून राजकीय मैदानात रणधुमाळी सुर झाली आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप काल रविवारी मुंबईत झाला. त्यानंतर लगेचच महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्यानं मनसे महायुतीत सामील होणार की नाही, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.