"शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार", शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये काही जागांबाबत तिढा कायम आहे. त्यामुळे या जागावाटपाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जागावाटपाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. या बैठकीत सर्व जागा निवडून आणण्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेच्या जागा शिवसेनेकडेच राहणार आहेत. नाशिकची जागा शिवसेनेला मिळणार आहे, कारण ती आम्ही घेणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.
माध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले, "२ तारखेपासून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. महायुतीचे मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीमध्ये तिढा नाही. १६ ते १८ जागा लढण्याची तयारी होती,१६ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत. संभाजीनगरच्या जागेबाबत बोलताना ते म्हणाले, ही जागा निवडून आणणे हा आमचा ध्येय आहे.
उमेदवार हा शिवसैनिक असेल. आम्ही याबाबत बैठक घेतली. जागावाटपाबाबत चर्चा झाली आहे. आता नावं जाहीर करणं बाकी आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपसोबत संबंध आहे. काही छुपा पाठिंबा देत आहेत. लवकर पक्ष प्रवेश होईल. रोहित पवार कुणाचा प्रचार करतात याबाबत साशंकता आहे", असंही शिरसाट म्हणाले.