‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? शिवसेनेचा शिंदे-भाजपाला सवाल
आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्लबोल करण्यात आला आहे.
दसरा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. मात्र, महाराष्ट्र, मराठी एकजुटीत फूट पाडण्यासाठी काही नतद्रष्टांची आजची निवड केली असून हिंदुत्वाची वज्रमूठ असलेली शिवसेना कमजोर करण्यासाठी काही लोकांनी आजचा मुहूर्त निवडला असला तरी शिवसेना ही काही लेचापेचांची संघटना नाही असे शिवसेनेने विरोधकांना ठणकावले आहे. विजयादशमीच्या दिवशी सर्व अमंगल गोष्टींचा, कपट-कारस्थानांचा नाश होतो म्हणून विजयादशमीला आपल्या हिंदू संस्कृतीत मोठे महत्त्व आहे. यंदाचा दसराही अशा रावणांचा, महिषासुरांचा नाश करणार आहे. रावण मारला गेला तो आजच्याच दिवशी. रावणाने स्वतःलाच देव समजण्याची मोठी चूक केली होती. त्या अहंकाराने त्याचा बळी घेतला. महाराष्ट्रात व देशात सध्या अशा अहंकाराच्या वावटळी निर्माण झाल्या असल्याचे सूचक वक्तव्य अग्रलेखात करण्यात आले आहे. बहुमतातले सरकार पैसा आणि धमक्या देऊन पाडणे हे पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडण्यासारखेच सोपे आहे असे काही लोकांना वाटत आहे, पण महाराष्ट्रातले नवे सरकार महाराष्ट्र नामशेष करायलाच निर्माण झाले. असे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे.
‘पीएफआय’सारख्या दहशतवादी विचारांच्या संघटनांचा बीमोड केला जात आहे, हे चांगलेच आहे. अशा प्रकारची विषवल्ली उपटून नष्टच केली पाहिजे. अशा कारवाया राष्ट्रहितासाठी आवश्यक ठरतात, पण कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ‘जैसे थे’ आहे. तेथील कश्मिरी पंडितांचा आक्रोश दिल्लीला अस्वस्थ करू शकलेला नाही. तसेच रुपयाची किंमत मातीस मिळाली, महागाई वाढली, बेरोजगारी वाढतच आहे, शेतकरी आत्महत्या करतोच आहे व त्यावर उपाय काय, तर यापुढे ‘हॅलो’ म्हणायचे नाही, तर ‘वंदे मातरम्’ म्हणा! ही मातृभूमी आमचीच आहे. त्या मातृभूमीपुढे आम्ही सदैव नतमस्तक आहोत, पण ही भूमी खऱ्या अर्थाने सुजलाम् सुफलाम् कधी होणार? चीन फक्त लडाखच्या सीमेवर नाही, तर अरुणाचलातही घुसला आहे. त्यांना धडा कधी शिकविणार? असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे.
शिवतीर्थावर विचारांचे सीमोल्लंघन होणार असून कोणी कितीही अपशकुन करू द्या, महाराष्ट्रात शिवसेनेचाच भगवा फडकत राहील असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. आज मुंबईवर शिवसेनेचे राज्य आहे. विरोधकांना मात देऊन पुन्हा मुंबई जिंकूच असा आत्मविश्वासही अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सच्चा शिवसैनिक चालत, धावत, मिळेल त्या वाहनाने शिवतीर्थाकडे निघाला आहे. रणमैदान सज्ज होत आहे. ‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? अशी जोरदार टीका शिवसेनेचा अग्रेलख सामनामधून करण्यात आली आहे.