'शिंजो आबे'च नाही, तर जगातल्या अनेक बड्या नेत्यांचा शेवट हत्येनं झालाय; सर्व हत्यांमध्ये 'ही' गोष्ट मात्र सारखीच
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आबे एका प्रचार सभेला संबोधित करत असताना ही घटना घडली आहे. हल्लेखोरानं त्यांच्या पाठीत गोळी झाडली. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे तीन तासांनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. मात्र अशा प्रकारे मरण पावलेले आबे हे जगातील पहिले नेते नाहीत. याआधीही अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. यातील तीन मोठी नावं एकट्या भारतातली आहेत.
राजकीय नेत्यांवर होणारे हल्ले आणि हत्यांना मोठा इतिहास आहे. इ.स.पूर्व ४४ मध्ये रोमन शासक ज्युलियस सीझरचीही हत्या झाली होती. इथूनच राज्यकर्त्यांच्या हत्येचा इतिहास सुरू झाला असं म्हणता येईल. ज्युलियस सीझरने स्वतःला रोमन्सचा आजीवन शासक घोषित केलं होतं. इ.स. पूर्व 15 मार्च 44 रोजी 60 मंत्र्यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता. सीझरच्या तब्बल शरीरावर 23 वार करण्यात आले होते. या हत्येनंतर रोमन साम्राज्यात गृहयुद्ध सुरू झालं होतं.
अलीकडच्या काळात सुद्धा अशी अनेक नावे आहेत ज्यामध्ये राजकारण्यांच्या हत्या झाल्या आहेत. यामध्ये महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी ते जॉन एफ. केनेडी, मार्टिन ल्यूथर किंग आणि अब्राहम लिंकन अशा बड्या नावांचा यामध्ये समावेश आहे.
1) अब्राहम लिंकन : अब्राहम लिंकन यांची 14 एप्रिल 1865 रोजी संध्याकाळी हत्या झाली. लिंकन हे अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष होते. लिंकन थिएटरमध्ये नाटक पाहत असताना त्यांच्या डोक्यात मागून गोळी मारण्यात आली होती.
2) महात्मा गांधी : महात्मा गांधींची हत्या ही सर्व भारतीयांना ज्ञात असलेली हत्या आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी प्रार्थना सभेला जात असताना नथुराम गोडसेने तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गांधींना हवं असतं तर ते फाळणी थांबवू शकले असते, असं गोडसेचं मत होतं. गांधी हत्येप्रकरणी गोडसेला फाशीची शिक्षा झाली होती. गोडसेला १५ नोव्हेंबर १९४९ रोजी फाशी देण्यात आली.
3) लियाकत अली खान : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची १६ ऑक्टोबर १९५१ रोजी हत्या झाली. रावळपिंडीत ते जाहीर सभेला संबोधित करत असताना, हल्लेखोराने त्यांच्या छातीवर गोळीबार केला. पोलिसांनी तात्काळ हल्लेखोराला ठार मारलं, अशी माहिती आहे.
4) जॉन एफ. केनेडी : अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी हत्या करण्यात आली. टेक्सासमधील डॅलस येथे त्यांची हत्या करण्यात आली. केनेडी यावेळी त्यांच्या पत्नीसोबत होते. शहराच्या मध्यभागी पोहोचताच केनेडी यांनी आपल्या लिमोझिनचं छत उघडलं होतं. डॅलसमध्ये आल्यानंतर पुढच्या तासाभरातच केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. 'ली हार्वे ओसवाल्ड' नामक व्यक्तीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, परंतु त्याच्यावर खटला दाखल करण्यापूर्वीच 'जॅक रुबी' नावाच्या व्यक्तीने त्यांची हत्या केली होती. केनेडी यांची हत्या आजही एक रहस्य आहे.
5) मार्टिन ल्यूथर किंग जूनियर : 29 मार्च 1968 रोजी, मार्टिन ल्यूथर बेहर टेनेसी येथे उपचार घेत असलेल्या लोकांना भेटण्यासाठी गेले. मार्टिन ल्यूथर हा अमेरिकन आंदोलक होता. 3 एप्रिल रोजी त्यांनी टेनेसी येथे भाषण केलं. दुसऱ्या दिवशी 4 एप्रिल रोजी सकाळी मार्टिन हॉटेलच्या बाल्कनीत उभा असताना त्याला गोळी लागली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या हत्येनंतर दोन महिन्यांनी जेम्स अर्ल रे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली, त्याने हत्येची कबुली दिली होती.
6) यित्झाक राबिन : इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांची ४ नोव्हेंबर १९९५ रोजी हत्या झाली. ते तेल अवीवच्या किंग्स ऑफ स्क्वेअरमधील रॅलीहून परतत होते. त्यानंतर यिगल अमीर नावाच्या हल्लेखोराने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, त्यापैकी दोन गोळ्या राबिनला लागल्या. अमीरला लगेच अटक करण्यात आली. त्याला खुनासाठी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा झाली.
7) बेनझीर भुट्टो : पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी हत्या करण्यात आली. रावळपिंडीमध्ये एका रॅलीला संबोधित करून परतत असताना भुट्टो यांची हत्या झाली. त्यानंतर हल्लेखोर त्याच्याजवळ आला आणि त्याने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. नंतर हल्लेखोराने स्वत:ला उडवलं.
8) जोव्हेनेल मोझेस : 7 जुलै 2021 रोजी कॅरिबियन देश हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हॅनिल मोसे यांची हत्या झाली. त्यांच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली होती. या हल्ल्यात त्यांची पत्नी मार्टिन मोसे ही गंभीर जखमी झाली आहे. मोशेच्या हत्येमागे ड्रग माफियांचा हात असल्याचे बोलले जात होते.
9) इंदिरा गांधी : 31 ऑक्टोबर 1984 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच दोन अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांची हत्या त्यांचे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी केली होती. बेअंत सिंग यांचा कोठडीत मृत्यू झाला. सतवंत सिंग आणि त्याचा साथीदार केहर सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दोघांनाही 6 जानेवारी 1989 रोजी फाशी देण्यात आली होती.
10) राजीव गांधी : 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एल. टी. टी. ई.च्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यादिवशी राजीव गांधी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे सभा घेणार होते. मानवी बॉम्ब बनलेला धनू नावाची व्यक्ती त्यांच्याजवळ आली आणि त्यांच्या पायाला स्पर्श करण्याच्या बहाण्याने नतमस्तक झाली. धनु उठताच मोठा स्फोट झाला. याच घटनेत राजीव गांधी यांचं निधन झालं.
एकूणच या सर्व हत्येच्या घटना पाहता यामध्ये एक साम्य दिसून येतं. यातील बहुतांश नेत्यांच्या हत्या या खुल्या जागेवर सभेला संबोधित करत असताना, रॅलीमधून जात असताना झाल्या आहेत.