देश स्वतंत्र झाल्यापासून मिळाला नाही, तेवढा निधी चार दिवसात आणला; शिंदे गटातील अब्दुल सत्तारांच दावा
सिल्लोड | अनिल साबळे : देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत जेवढा निधी आला नाही, तेवढा मोठा निधी या चार दिवसात मंजूर करून आणल्याचं शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. सिल्लोड येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हा दावा केला आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात परतले, मात्र मी 4 दिवस मुंबईतच होतो. या चार दिवसांत मी मतदारसंघातील अनेक प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे सादर करून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून घेतली. देश स्वतंत्र झाल्या पासून जितका निधी मिळाला नाही त्यापेक्षा जास्त निधी या चार दिवसात मिळाला असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदामुळे सिल्लोड - सोयगाव मतदारसंघाला विकासाची नवसंजीवनी लाभेल असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की, गेल्या चार दिवसात मतदारसंघातील 107 गावांसाठी 365 कोटी रुपयांची वाटर ग्रीड योजना, नॅशनल सुत गिरणीसाठी 80 कोटी, नवीन सिंचन प्रकल्प, नाट्यगृह, 2 हजार बेघरांना घरं, शासकीय वसाहत अशा महत्वकांक्षी योजनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असल्याचं आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. या मंजूर कामांच्या भूमिपूजनसाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला आहे. येत्या काही दिवसातच यासाठी निश्चित तारीख मिळेल. मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यातील पहिला कार्यक्रम हा सिल्लोड येथे होणार असल्यानं या सोहळ्याच्या तयारीसाठी आतापासूनच तयारीला लागावं असं आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी समर्थकांना केलं आहे.