आदित्य ठाकरेंच्या आरोपांना केसरकरांचं उत्तर; म्हणाले, पोकळ...
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज माध्यमांशी संवाद साधून वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा सुरु असून, त्यामाध्यमातून ते शिंदे (CM Eknath Shinde) गटाच्या लोकांवर ते आरोप करत आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, जे लोक शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांच्या रक्तात शिवसेना नाहीच. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावं, तुम्हाला शिवसेनेचा वारसा हा रक्तातून मिळाला असला तरी, ज्या लोकांवर तुम्ही टीका करताय त्यांनी त्यांची हयात पक्ष उभा करण्यासाठी घालवली आहे. पक्षासाठी हे लोक तुरुंगात राहिले आहेत, यांच्या आंगावर केसेस आहेत. तसंच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचं केलेलं आवाहन हे पोकळ आहे असं दीपक केसरकर म्हणाले आहेत असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
नाशिकचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, कॅबीनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती बाहेर देता येत नाही. मात्र एकनाथ शिंदे यांना धमकी आल्यानंतर त्यांना सुरक्षा देणं गरजेचं होतं. मात्र त्यावेळी असे आदेश देण्यात आले की, एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात येऊ नये. त्यानंतर माजी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, याबद्दलचे सर्व खुलासे शंभुराज देसाई योग्य वेळेवर करतील.
दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितलं की, उद्धव साहेब आजारी असताना हे बंड केलं गेलं असं म्हटलं जातंय. मात्र तसं अजिबात नाही. जेव्हा उद्धव साहेब बरे झाले, तेव्हा एकनाथ शिंदे त्यांना जाऊन भेटले होते. काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडा असं सांगितलं होतं असं केसरकर म्हणाले. प्रादेशिक अस्मिता असते, या लोकांवर अन्याय होत असेल तेव्हा त्यांच्या भागातील लोक पेटून उठतील. राणेंनी बंड केल्यावर कोकणात शिवसेनेचे उमेदवार निवडून आले नव्हते. महाराष्ट्र हा सहा विभागांचा बनलेला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आणखी प्रादेशिक अस्मिता समजत नाही. ते लहान आहेत असं दीपक केसरकर म्हणाले.