एकनाथ खडसेच '81 खोके सबकुछ ओके' असल्याचा शिंदेगटातील आमदाराचा आरोप
जळगाव| मंगेश जोशी: मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर हे सर्वश्रुत असून एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर व आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात गेल्यानंतर हे राजकीय वैर अधिकच वाढले आहेत . आता त्यात चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वैर हे अधिकच गडद होण्याची चिन्ह दिसत असतानाच आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
आमदार व्हायचं होतं तर भाजप शिवसेनेची युती होती ती का तोडली ? असा थेट हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर केला आहे. भाजप शिवसेनेची युती तुटेल असा कोणताही भविष्यकार सांगू शकत नव्हता, मात्र 2014 मध्ये हे काम आमच्याच मतदारसंघातील एका माणसानं केले असल्याचे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे रावेर मध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर हल्लाबोल केला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी युती तोडली मात्र त्यांनी युती तोडल्यामुळेच आपण आमदार झालो . पण मंत्री महोदयांनी राष्ट्रवादीत जाऊन काय झाले तर आमदार झाले आणि तेच " 50 खोके सबकुछ ओके " असल्याचे म्हणत आहेत तर मग जिल्हा बँकेतून मुक्ताईनगर साखर कारखान्यासाठी 81 कोटी कोणी मंजूर करून घेतले? मग ते 81 कोटी सबकुछ ओके नाही का? असाही प्रश्न आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
एकीकडे जिल्हा बँकेतून शेतकऱ्यांना एकरी चाळीस हजार कर्ज मिळते मात्र त्यासाठी दीड लाखाची जमीन शेतकऱ्यांना गहाण ठेवावी लागते एवढेच नाही तर वारंवार फेऱ्या देखील मारावा लागतात तेव्हा कुठे शेतकऱ्यांच्या एटीएम मध्ये कर्जाचे पैसे येतात . मात्र मुक्ताईनगर साखर कारखान्यासाठी 81 करोड रुपये कर्ज कसे मिळाले ? चेअरमन होते म्हणून 81 कोटी कर्ज आपल्या साखर कारखान्यासाठी मंजूर करून घेतले असा घाणाघातही आमदार चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केला आहे.