शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी ट्वीट केलेला सुप्रिया सुळेंचा 'तो' फोटो एडिटेड
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला. त्यानंतर विरोधकांकडून श्रीकांत शिंदे यांच्यासह सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर शिंदेगटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीटरवर सुप्रिया सुळे यांचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये, सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत. तर, शेजारी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बसलेले दिसत आहेत.
हा फोटो एडिटेड असल्याचं आलं समोर:
दरम्यान, या फोटोमध्ये सुप्रिया सुळेंचा जो फोटो आहे तो आधीच्या एका कार्यक्रमामधील असून तो फोटो सुप्रिया सुळेंनी आधीच फेसबूकवर पोस्ट केला आहे. तोच फोटो एडिट करून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसवल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, हा फोटो एडिटेड असल्याचं शीतल म्हात्रेंना ठाऊक नव्हतं की, माहीत असूनही केवळ आपल्या नेत्यावरील टीकेला प्रत्यूत्तर द्यायचं म्हणून हा फोटो शीतल म्हात्रेंनी पोस्ट केला हा विषय चर्चेचा ठरतोय. जरी शीतल म्हात्रेंना हा फोटो एडिटेड असल्याची कल्पना नसेल तरी, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना आपण त्या पोस्टमधील सत्यता तपासून घ्यायला हवी. त्यामुळे, ही बाब नेटकऱ्यांच्या व विरोधकांच्या लक्षात आल्यास शीतल म्हात्रे चांगल्याच ट्रोल होऊ शकतात.