काँग्रेस पक्षाला नवी दिशा दाखवण्याची शशी थरुर यांच्यात क्षमता, देशमुखांकडून कौतुक
अनेक दिवसांपासून देशात काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीवरून घमासान सुरु आहे. अशातच आज भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे नेते खासदार डॉ. शशी थरुर यांनी शुक्रवारी (30 सप्टेंबर) नामांकन भरले. कॉंग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या संसदीय मंडळाचे सदस्य माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शशी थरूर यांचे कौतुक केलं आहे.
देशमुख बोलताना म्हणाले की, "कॉंग्रेसचे डॉ. शशी थरुर हे लोकप्रिय खासदार आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने होत असून, ही स्वागतार्ह बाब आहे," अशी प्रतिक्रिया या निवडणुकीवर त्यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "पक्षात विकेंद्रीकरणासाठी हे महत्वाचे पाऊल असून कॉंग्रसचे भविष्य उज्ज्वल आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पक्षाला मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. पक्षाला आणखी उंच भरारी घेता यावी, म्हणून कॉंग्रेस श्रेष्ठींनी लोकशाही पद्धतीने निवडणुकीसाठी घेतलेले हे महत्वाचे पाऊल आहे. डॉ. शशी थरुर यांचे पक्षातील सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. पक्षाला नवी दिशा दाखवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे." असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.