शेअर मार्केटचे बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचे निधन
मुंबई : शेअर मार्केटमधील किंग राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बुल नावाने ते प्रसिद्ध होते. दरम्यान, झुनझुनवाला यांच्या निधनामुळे शोककळा पसरली असून गुंतवणूकदारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ट्वीटरवर दिग्गजांपासून गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.
राकेश झुनझुनवाला मागील काही दिवसांपासून आजारी असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या उपचार सुरु होते. त्यांना २-३ आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ब्रीच कँडी हॉस्पिटलने झुनझुनवाला यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. आज सकाळी ६.४५ वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले.
राकेश झुनझुनवाला यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार आहे. झुनझुनवालाची ही यशोगाथा अवघ्या पाच हजार रुपयांपासून सुरू झाली. आज त्यांची एकूण संपत्ती 40 हजार कोटींच्या आसपास आहे. या यशामुळे झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजाराचा बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे असे संबोधले जाते. सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावत असतानाही झुनझुनवाला कमाई करत होते. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर बिग बुलने एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी अकासा एअर या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि 7 ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे.