महाविकास आघाडीचे सर्व आमदार ट्रायडेंटवर; शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चुरस मोठ्या प्रमाणात वाढली असून, महाविकास आघाडीचे सर्व आमदार सध्या मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटवर दाखल झाले आहेत. राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीला सात उमेदवार उभे आहेत. यामध्ये भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येक एक असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी आपले आमदार हॉटेलमध्ये हलवण्याची ही पहिली वेळ नाही. अशाच पद्धतीनं यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचे सर्व आमदार हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात आले आहेत. यावेळी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असलेले नेते शरद पवार सुद्धा इथे दाखल झाले आहेत.
एकीकडे महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र हॉटेलमध्ये एकत्र आले असताना, दुसरीकडे ईडीच्या कारवाईला तोंड देत असलेले नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाचं काय असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर आता ईडीने कैद्यांना मतदानाचा हक्क नसतो असं म्हणत त्यांना मतदान करता येणार नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली आहेत.