'महाराष्ट्राची सुटका झाली' भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच शरद पवारांची प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरच केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही सोडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी महाराष्ट्राची सुटका झाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवार म्हणाले की, माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. चांगला निर्णय घेण्यात आला. या आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. आता घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानविरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी, असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती.