राज ठाकरेंना पवारांचे जोरदार प्रत्युत्तर: म्हणाले, दोन दिवसांपुर्वीच महाराजांवर बोललो
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी कालच्या राज ठाकरे यांच्या सभेनंतर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेवर शरद पवारांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार यांनी यावेळी राज यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेतला.
छत्रपती शिवरायांचा (Chatrapati Shivaji Maharaj) नाव शरद पवार घेत नाहीत. ते केवळ त्यांच्या सभांमध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचंच नाव घेतात, असा थेट आरोप राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं. दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीत होतो. तेथील माझं भाषण मागवून घेतलं. शिवाजी महाराजांचं योगदान या विषयावर मी 25 मिनिटं बोललो आहे. त्यात मी अनेक गोष्टी सांगितल्या. पण कोण काय बोलंलंय, हे वृत्तपत्र न वाचताच वक्तव्य केले जाते. फुले शाहू आंबेडकरांचं मी नाव घेतो, याचा मला अभिमान आहे. शिवाजी महाराजांबाबत सविस्तर वृत्त काव्यात पहिल्यांदा कोणी लिहिलं असेल तर ते फुल्यांनी लिहिलं. आंबेडकर , शाहू आणि फुले हे शिवाजी महाराजांवर आस्था असणारे घटक आहेत. महाराजांचा आदेश लक्षात घेऊन आपल्या हातातील सत्तेचा वापर कसा करावा याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांचा उल्लेख करणं म्हणजे शिवाजी महाराजांचा विचारच मांडणं आहे, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.