"मलिकांचा चुकीच्या लोकांशी संंबंध असेल यावर विश्वास नाही, माझ्यावरही असे आरोप झाले होते"
मुंबई : नवाब मलिक यांच्यावर कारवाई करत केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना अटक केली होती. त्यानंतर टेटर फंडींग प्रकरण, मनी लॉंड्रींग प्रकरणात त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. दहशतवाद्यांशी संबंधीत लोकांसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या सर्व आरोपांमध्ये ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यादरम्यानच विरोधकांनी देखील नवाब मलिकांवर (Nawab Malik) दाऊदशी संबंधीत असल्याचा आरोप केला. या सर्व मुद्द्यांवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली बाजू मांडली आहे.
शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्याबद्दल बोलताना सांगितलं की, "माझ्या मनात मलिक यांच्या इंटेग्रिटीबद्दल अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवण्यासंबंधी विश्वास नाही. असे आरोप केले जातात. याचे उदाहरण मी स्वत: आहे. माझ्यावरही असेच अनेक आरोप केले होते. शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की आम्ही जी टीका करत होतो त्यात काही तथ्य नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे संपूर्ण चित्र समोर आल्यानंतरच नवाब मलिक यांची स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे नाही त्या गोष्टींना लक्ष्य करून कारण नसताना समाजा समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसतोय. कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही. गेली अनेक वर्षे मी नवाब मलिक यांना ओळखतो."