"नरेंद्र मोदी देशाचे नव्हे, भाजपचे पंतप्रधान आहेत"; शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात
देशाचा प्रधानमंत्री संपूर्ण देशाचा असतो. पण मोदींची भाषणं ऐकली तर, एक गोष्ट स्पष्ट होते, ते देशाचे पंतप्रधान नाहीत, तर ते भाजपचे पंतप्रधान आहेत. देशाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते, त्यांना राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकतो, पण राष्ट्रीय दृष्टीकोनाची गरज असते. आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत. त्यांनी राष्ट्रीय दृष्टीकोन ठेवला पाहिजे. पण मोदींना याचं विस्मरण झालं आहे. ते सातत्याने कधी नेहरुंवर, कधी राहुल गांधीवर, कधी माझ्यावर, तर कधी आघाडीवर टीका करतात. तुम्ही प्रधानमंत्री म्हणून काय करणार आहात, हेच देशाला सांगा, असं थेट आवाहन शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. ते चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला लोक मनापासून तयार आहेत. त्याच आघाडीचे खंदे उमेदवार चंद्रकांत खैरे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचं आहे आणि देशाचं राजकारण योग्य दिशेनं न्यायचं आहे. मी इथे यायच्या आधी मोदींचं भाषण ऐकत होतो. ते आज मराठवाड्यात आहेत. पंडीत जवाहरलाल नेहरु स्वातंत्र्याच्या चळवळीत आयुष्यातील दहा वर्षांपेक्षा जास्त वर्ष इंग्रजांशी लढायला घालवलीय. ते तुरुंगाता गेले. स्वत:च्या कुटुंबाचा विचार केला नाही. भारत जगात महत्त्वाची सत्ता व्हावी, यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, अशा व्यक्तीवर टीका करणं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांची मानसिकता समजते.
माझ्या हातात सत्ता द्या, मी ५० दिवसांच्या आत महागाई संपवतो. पण काहीच झालं नाही. पेट्रोल-डिझेलचे भावही कमी केले नाही. गॅसच्या किंमती कमी करणार, असं आश्वासन दिलं होतं. पण गॅसच्या किंमती वाढल्या. जगात बेरोजगारीबाबत अभ्यास केला गेला आणि त्यातून एक अहवाल समोर आला. भारतातीत १०० मुलं शाळा, महाविद्यालयातील मुलं बाहेर पडतात, त्यापैकी ८७ मुलं बेरोजगार आहेत. या देशाची ८७ टक्के तरुण पिढी बेरोजगारीनं त्रस्त आहे. या देशाचे प्रधानमंत्री तरुणांचा किती विचार करतात, हे यावरुन सिद्ध होतं. मराठवाड्यात पाणी नाही. दुष्काळाचं संकट आहे. अनेक ठिकाणी समस्या आहेत.