"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात
नरेंद्र मोदी २०१४ ला सत्तेत आले. सत्तेत आल्यावर लोकांना त्यांनी सांगितलं, आम्ही पेट्रोलचे भाव कमी करणार आहोत. त्यावेळी पेट्रोलचे दर ७१ रुपये होते. पण आज पेट्रोलचे दर १०६ रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. स्वयंपाक करण्यासाठी आपल्या माता भगिनींना गॅस सिलिंडर लागतो. २०१४ ला गॅस सिलिंडरची किंमत ४१० रुपये होती. ती किंमत ५० टक्क्यांनी कमी करणार, असं मोदी म्हणाले होते. पण आता सिलिंडरच्या किंमती अकराशे रुपयांवर पोहोचल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी मोदी मुंबईला आले होते. त्यावेळी त्यांनी लोकांना सांगितलं होतं, सत्ता आल्यावर गॅस सिलिंडरच्या किंमती कमी करु, पण मोदींनी किंमती कमी केल्या नाहीत. तर देशात महागाई वाढवली, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. ते हातकणंगलेत महाविकास आघाडीच्या सभेत बोलत होते.
शरद पवार जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, जगात आयएलओ नावाची संघटना आहे. ही संघटना जगात बेरोजगारीचा अभ्यास करते. शाळा, कॉलेजमधून जी शंभर मुलं नोकरीसाठी बाहेर पडतात, त्यातील ८७ मुलांना आज नोकरी मिळत नाही. ८७ टक्के मुलं आज नोकरीवर नसतील, अस्वस्थ असतील, तर या सरकारने दिलेलं आश्वासन गेलं कुठे, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार सर्वांना आहे. अनेक ठिकाणचे अनेक उदाहरणे आहेत.
लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधींना अपमान करण्याचा काम हे मोदी सरकार करत आहे. झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. तेथील मुख्यमंत्री आदिवासी आहे. एक दिवशी रांचीमध्ये आदिवासींच्या प्रश्नासाठी एक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या संमेलनात आदिवासींच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मोदी सरकार आदिवासींच्या समस्येवर दुर्लक्ष करतात.
म्हणून या संमेलनात झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्याचे परिणाम काय झाले, मोदींनी त्यांच्यावर टीका करतात म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. देशाच्या राजधानीत दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना लोकांनी निवडून दिलं. त्यांच्या हातात दिल्लीची सत्ता दिली. त्यानंतर केजरीवालांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. त्यांनी शिक्षणात सुधारणा केली. त्यांनी आरोग्य खात्यात सुधारणा केल्या. रस्ते, पर्यावरणाचे प्रश्न सोडवले.
त्यांनी इतकं चांगलं काम केलं की, देशातील अनेक राज्यातील लोक दिल्लीचा विकास बघायला येतात. भारताच्या बाहेरील लोकसुद्धा दिल्लीचा चेहरा कसा बदलला, हे पाण्यासाठी येतात. त्यांनी एका संमेलनात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर हल्ला केला. त्याचाही परिणाम काय झाला, आज अरविंद केजरीवाल तुरुंगात आहेत. याचा अर्थ असा आहे, आपण हळूहळू हुकूमशाहीच्या मार्गाने जात आहोत. देशातील संविधान या सरकारने अस्थिर केलं आहे.