"ती चूक परत करणार नाही..."; अमरावतीत महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
नवनीत राणांना उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली होती. मी अमरावतीकरांची माफी मागतो. ही चूक परत होऊ देणार नाही. देशाचं संविधान मजबूत केलं पाहिजे. संविधानावर संकट येण्यासारखं चित्र निर्माण झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आता ठाकरेही आहेत, याचा मला आनंद आहे. मोदींसमोर कुणालाही एक शब्द बोलण्याचा अधिकार नाही. मोदींनी दहा वर्षात काय केलं, ते आधी सांगा. पंतप्रधानांच्या भाषणात दृष्टीकोनाचा अभाव दिसतो. पंतप्रधान भाषणात विकासकामांवर बोलण्याऐवजी विरोधकांवर टीका करत असतात. त्यामुळे मोदींच्या हातातून सत्ता काढून घेतली पाहिजे, असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते अमरावतीत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
पवार जनतेशी संवाद साधताना म्हणाले, मोदींची खासदारांमध्ये दहशत आहे. मोदी कुठेही गेले तरी नेहरु आणि काँग्रेसवर टीका करतात. जवाहरलाल नेहरुंचं देशासाठी असलेलं योगदान नाकारू शकत नाही. आम्ही काय विकास केला, त्यापेक्षा तुम्ही काय केलं, ते आधी सांगा, असा थेट सवाल पवारांनी विरोधकांना विचारला आहे.
राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठ्या मताधिक्क्यानं विजयी करा. वानखेडेंना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा. पहिल्या टप्प्यातील मतदान पाहून चिंता वाटत आहे. नागपूर शहरात ५४ टक्के, गडचिरोलीत ७० टक्के मतदान झालं आहे. याच्यातून काही शिकलं पाहिजे. आम्हाला वानखेडेंच्या निवडणुकीत ८० टक्केहून अधिक मतदान पाहिजे, असं आवाहन यावेळी शरद पवारांनी जनतेला केलं.