शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."
नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, आमच्या हातात सत्ता दिली, तर देशातील महागाई कमी करणार, पण त्यांनी सत्ता आल्यावर काहीच केलं नाही. इथेनॉलच्या तेलाचे भाव वाढवले. गॅस सिलेंडरचे भाव वाढवले. ही सर्व धोरणं आखतात, ती धोरणं देशाची महागाई कमी करण्यासाठी नाही, तर महागाई वाढवण्याच्या संबंधीत आहेत. जो महागाई वाढवतो, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. त्यासाठी शशिकांत शिंदेंना मतदान करणं गरजेचं आहे, जनतेला असं आवाहन करतानाच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते शशिकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
पवार जनतेशी संवाद साधताना पुढे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवस जाहीरपणे बोलले, दोन पक्ष फोडून आज मी याठिकाणी आलो. उभं करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही. पक्ष फोडून काही लोकांना तुम्ही संधी दिली, पण या देशाचं राजकारण उद्धवस्त करण्याची भूमिका तुम्ही घेतली आहे, ही भूमिका लोकांना पसंत नाही. देश एकसंध ठेवायचं असेल, या देशाची लोकशाही मजबूत करायची असेल, तर राजकीय पक्ष व्यवस्थित चालतील, याची काळजी घेतली पाहिजे.
पंतप्रधान मोदी कुठेही गेले की ते आमच्यावर टीका करतात. राहुल गांधींवर टीका करतात. देशाचा अभ्यास करण्यासाठी राहुल गांधी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी चालत गेले. लोकांना भेटले, त्यांचे प्रश्न समजून घेतले. एव्हढे कष्ट त्यांनी घेतले, त्यांच्यावर तुम्ही टीका करता. जवाहरलाल नेहरुंवर टीका करता. ज्या नेहरुंनी स्वातंत्र्याआधी आयुष्याची ११ वर्षे तुरुंगात घालवली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाही पद्धतीने कसा चालेल, याची खबरदारी घेतली. संपूर्ण जगात भारताचा नावलौकीक वाढवला, त्यांच्यावर तुम्ही टीका करता.
लोकसभेची निवडणूक आली आहे आणि या देशात एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे. या निवडणुकीबाबत लोकांना चिंता वाटत आहे. कारण या महाराष्ट्राचं नेतृत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात. त्यांच्या लक्षात आलंय की हा महाराष्ट्र वेगळ्या रस्त्यानं जाणार आहे. त्यांना लोकांचा पाठिंबा मिळणार नाही. त्यामुळे लोकांना काहीतरी वेगळं सांगून त्यांच्या मनात नसलेल्या गोष्टी आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अमित शहा महाराष्ट्रात फिरतात आणि भाषणं करतात. ते सांगतात, शरद पवारांनी महाराष्ट्रात काय केलंय, ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. ते देशाचे गृहमंत्री आहेत, पण आपण देशासाठी काय केलं ते शहा सांगत नाही. दुसऱ्यांना काय केलं, हा प्रश्न शहा विचारतात, असं म्हणत शरद पवारांनी अमित शहा यांचाही समाचार घेतला.