EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Shantigiri Maharaj Latest News : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या मतदानकेंद्रात सकाळी सात वाजता मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशिनला हार घातला. त्यामुळे आचारसंहिता नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराजांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले शांतीगिरी महाराज?
आज ईव्हीएम मशिनला हार घालण्याच्या प्रकाराचा मुद्दा उपस्थित केला गेला. त्यामुळे सर्व जनतेनं याकडे लक्ष द्यावं. इव्हीएम मशिनचं पूजनंही केलं नाही. इव्हीएम मशिनला हारही घातला नाही. ईव्हीएम मशिनच्या कव्हरवर भारतमातेचं चित्र होतं. म्हणून भारत मातेच्या फोटोला मी हार घातला. हा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यावा. कपड्यांबाबत पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. हा लोकशाहीप्रधान देश आहे. कोणता ड्रेस घालावा आणि कोणता घालू नये, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे.
त्यामुळे बाबांवर पोलिसांनी अन्याय केला आहे. हार घातल्याप्रकरणी जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याबद्दल आमची वकिलांची टीम त्यासंदर्भात लक्ष देणार आहे. भारत मातेच्या फोटोवर साधा हार घातला तर गुन्हा दाखल होतो. इतर उमेदवार पैसे वाटतात, समाजात दारुच्या बाटल्या वाटतात. त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पोलिसांनी सहकार्य करावं आणि निवडणूक शांततेत पार पाडावी.