अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाची दुसरी तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वी
भूषण शिंदे| मुंबई: पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाही काल दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री यशस्वीपणे पार पडली. महाकाय अशी ही तुळई एकूण 86 मीटर सरकविणे आवश्यक असून पैकी 25 मीटर पर्यंत सरकविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर उर्वरित अंतरावर ही तुळई सरकविण्याची कार्यवाही केली जाईल. त्यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पश्चिम रेल्वेसोबत समन्वय साधण्यात येत आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग सर्वसामान्य जनतेसाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. आता या पूल उभारणीतील महत्वाचा टप्पा म्हणजे दुसरी तुळई स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री दहावाजेपासून ते आज दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:00 वाजेपर्यंत या कालावधीत सदर तुळई रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याचे कामकाज यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या पूल विभागाने पश्चिम रेल्वे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून ही कार्यवाही पूर्ण केली. प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, कामगार यांनी योग्य नियोजन करून तुळई सरकविण्याची कार्यवाही पार पाडली.
गोखले पुलासाठी तुळई स्थापित करणे हे अभियंत्रिकी दृष्टया अत्यंत आव्हानात्मक असे काम आहे. पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज प्रगतिपथावर आहे. रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कामाची जोखीम व तांत्रिक बाबी तपासून, त्याचप्रमाणे रेल्वे वाहतूक व वीजपुरवठा या दोन्ही घटकांमध्ये खंड (ब्लॉक) मिळाल्यानंतर तुळई स्थापनेचे कामकाज केले जाते. एकूण 86 मीटर पैकी प्रारंभिक 25 मीटर अंतरावर तुळई सरकविणे आव्हानात्मक होते. ते यशस्वी झाल्याने आता उर्वरीत अंतरावर तुळई सरकविणे तुलनेने सुलभतेने करता येणार आहे. त्यासाठी पश्चिम रेल्वे सोबत सातत्याने समन्वय राखला जात आहे.
पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे सर्व सुटे भाग अंबाला येथील फॅब्रिकेशन प्रकल्पातून मुंबईत आणण्यात आले आहेत. तुळईचे सगळे भाग आल्यानंतर सुट्या भागांच्या जोडणीचे काम दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण झाले. प्रत्येक तुळईचे माप 1.0 मीटर रूंदीच्या पदपथासह 13.5 मीटर रुंद (3 अधिक ३3मार्गिका) आणि लांबी 90 मीटर आहे. तुळईचे वजन सुमारे 1300 मेट्रिक टन इतके आहे. तुळईच्या सुट्या भागाची कार्यस्थळावर जुळवणी तसेच रेल्वे भागावर स्थानापन्न करण्यासाठी प्रकल्पस्थळी उपलब्ध कमी जागा या बाबी लक्षात घेता 360 अंशामध्ये फिरणाऱ्या अवजड क्रेनचा उपयोग करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातील लोखंडी तुळईची जुळवणी रेल्वे रूळाच्या पूर्व बाजूस जमिनीपासून 14 ते 15 मीटर उंचीवर पूर्ण करण्यात आली. ही तुळई पूर्णपणे सरकविल्यानंतर 14 ते 15 मीटर उंचीवरून 7.5 मीटर पातळीपर्यंत खाली आणण्याचे काम पूर्ण करण्यात येईल. रस्ता रेषेमध्ये तुळई स्थापन झाल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
दुसरी तुळई रेल्वे भागावर सरकविण्याच्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालय अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्यामार्फत तसेच पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांमार्फत तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. तुळई पुढे सरकविण्याचे कामकाज करताना देखील पश्चिम रेल्वे प्राधिकरणाच्या परवानगीनंतर करण्यात येणार आहे. सदर दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हरब्रीज) काम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.