धनंजय महाडिकांची लाडक्या बहिणींना दमदाटी; सतेज पाटीलांनी घेतला समाचार, म्हणाले...
कोल्हापुरातील भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेल्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये जर तुम्हाला दिसल्या तर त्यांचे फोटो काढा त्यानंतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, अस वादग्रस्त वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होत. त्यांच्या या विधानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाडिकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
सतेज पाटील म्हणाले, तुमच्या या बोलण्यातून सिद्ध झाले आहे की, भाजपाने लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीसाठी आणली आहे. त्यामुळे राज्यातील महिला ही गोष्ट कधीच विसरणार नाहीत. याचे उत्तर ते या निवडणुकीमध्ये बरोबर देतील, महाराष्ट्रातील बहिणी या गोष्टी कधीही विसरणार नाही, असे सतेज पाटील म्हणाले आहेत.
तसेच , मला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना विचारायचे आहे की, भाजपच्या खासदारांनी केलेले हे वक्तव्य तुम्हाला मान्य आहे का ? तसेच परवा सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्यावर देखील ते बोलले. भाजपाचे नेते असे बेताल वक्तव्ये करुन महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत चालले आहेत. महाडिकांनी आपल्या भाषणातून बहिणींना धमकी दिली. तुमची व्यवस्था करतो म्हणून, व्यवस्था करतो, म्हणजे याचा अर्थ काय? असेही यावेळी सतेज पाटील यांनी विचारले आहे. चोराच्या मनात चांदणे बोलतात, त्यातला हा प्रकार असल्याचे ते म्हणाले आहेत. स्वत: चुकीचे वक्तव्य करायचे आणि चूक समोर आली की, म्हणायचे हे चुकीचे नाही. हे मोठे धाडस म्हणावं लागेल, असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान या वादग्रस्त विधानानंतर धनंजय महाडिक यांनी स्पष्टीकरण दिले, ते म्हणाले की, काँग्रेसने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. महाडिक म्हणाले, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ती गेम चेंजर ठरेल. माझ्या विधानाचा हेतू फक्त महिला मतदारांचे संरक्षण करणे हा होता. ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." महाडिक यांनी सांगितले की, या विधानाचा विपर्यास करून काँग्रेस फेक नेरेटिव्ह सेट करत आहे आणि महिलांना चुकीचा संदेश देत आहे. "महायुतीच्या योजनांचा लाभ घेऊन काँग्रेसच्या बाजूने जाण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे," असेही ते म्हणाले.