शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही ; उदयनराजे भोसले
प्रशांत जगताप|सातारा: 15 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाच्या विरोधात साताऱ्यातील मुस्लिम युवकाने आक्षेपार्ह स्टेटस इन्स्टाग्रामवर ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी देखील शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्याला जगण्याचा अधिकार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी करत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने देव काय असतो, देवाची संकल्पना काय असते हे समाजाला शिवाजी महाराजांनी त्यांच्या विचाराने दाखवून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या लोकांना ठेचलं पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे. महाराजांबद्दल असे विधान करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही अशा संतप्त भावना उदयनराजेंनी व्यक्त केल्या आहेत.