साताऱ्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस; गावातील अनेक घरांत शिरलं पाणी
इम्तियाज मुजावर, सातारा
परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. साताऱ्यातील मायणीत ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. पावसामुळे गावातील अनेक घरांत पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे.
या पावसामुळे सर्वत्र एकच हाहाकार उडाला असून मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने सर्वत्र वाहतूक खोळंबली होती. मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले.
गेली चार दिवस साताऱ्यातील दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जाणारा मायणी व परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे पाणी शेतीत साचल्याने अनेक ठिकाणी बांध फुटून ठिकठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
पावसाचा जोर अधिकच असल्याने मायणी येथील मल्हारपेठ - पंढरपूर महामार्ग, मायणी - मोराळे, मायणी - प्राथमिक आरोग्य केंद्र, मायणी- लक्ष्मीनगर, मायणी - शेडगेवाडी असे विविध रस्ते पाण्याखाली गेले आहेत.