सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतींचे धुमशान आजपासून रंगणार
प्रशांत जगताप : सातारा | सातारा जिल्ह्यातील 319 ग्रामपंचायतीचे धुमशान आजपासून रंगणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीची रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे. 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.त्यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे.
सातारा तालुक्यातील 39, कोरेगाव तालुक्यातील 51, वाई 7, खंडाळा 2, जावली 15, कराड 44, खटाव 15, महाबळेश्वर 6, माण 30, पाटण 86, फलटण 24, अशा एकूण 319 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे.. ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत असून 2 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.5 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे.तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर असून याच दिवशी दुपारी 3 नंतर अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्यास आज पासून प्रारंभ होत असल्याने गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.