Thane : ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात; आमदार रविंद्र फाटक म्हणाले...
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक गोविंदा पथकं ही संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात दाखल झालेले दिसून येत आहेत. अनेक सिनेसृष्टीतील कलाकार व अनेक राजकीय नेते या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला उपस्थिती लावणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर रविंद्र फाटक म्हणाले की, सर्व गोविंदांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आजचा दिवस वर्षभर ते बघत असतात. 2 महिने सराव करत असताना आजचा दिवस आनंदाचा असतो. मी सर्व गोविंदांना सांगतो की, दरवर्षी इथं 3 हंड्या लावल्या जातात. एक मुंबईकरता असते, एक आमच्या लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी आहे आणि एक ठाण्याकरता आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडीचं संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी जी योजना आणली त्याचे आज महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वागत होत आहे. असे रविंद्र फाटक म्हणाले.