"नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला, तर..."; संजय राऊतांनी दिला इशारा
Sanjay Raut Press Conference : काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असेल, हे सर्व पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी आहेत आणि लढत राहतील. आजच्या महाराष्ट्रदिनी साडेअकरा कोटी जनता सध्याच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र तोडण्याचा कितीही प्रयत्न केला, तर त्यांनी आधी संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पाहावी. १०७ हुतात्म्यांच स्मारक फोर्टला आहे, ते सुद्धा पाहून यावं. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्यांची काय अवस्था होते, त्याचे हे दोन प्रतिक आहेत. महाराष्ट्र दिल्लीपुढं कधीच झुकला नाही, हा इतिहास आहे. या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. महाराष्ट्र झुकला नाही, आपल्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्र लढत राहिला. पण सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या चाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. याला थैलीचे राजकारण म्हणतात, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.
राऊत पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राशी कधीच घेणंदेणं नव्हतं. महाराष्ट्राचं स्वाभिमान जपण्यासाठी भाजपने कधी पुढाकार घेतला असेल, तर त्यांनी दाखवावं. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि महाराष्ट्राच्या लढ्यात हे लोक कधीच कुठे नव्हते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राविषयी स्वाभिमान, प्रेम असण्याचं कारण नाही. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना महाराष्ट्रात सातत्याने लोकसभेच्या २१-२२ जागा लढत आली आहे. तिन पक्षांचं जागावाटप अत्यंत सन्मानाने झालं.
आम्ही २१ जागा लढत आहोत. २२ वी जागा उत्तर मुंबईची आम्ही शेवटच्या क्षणी काँग्रेसला दिली. नाहीतर आमचा २२ चा आकडा कायम होता. शिवसेना-फडणवीस गट १२-१३ जागा लढत आहेत. त्यांनी ७-८ जागा स्वत:च्या कमी करुन घेतल्या. यालाच लोटांगण घालणं म्हणतात. तुम्ही तुमच्या जागा कायम ठेऊ शकला नाही. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने तुमचे उमेदवार ठरवले किंवा कापले. ही स्वाभिमानाची गोष्ट नाही. ही एक लाचारी आहे. आपण कोणाच्या चरणाशी बसून हुजरेगिरी करतोय, त्याचं हे लक्षण आहे.