विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, "गुप्त मतदान असल्याने कोट्यावधी..."
Sanjay Raut Press Conference: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार जिंकले. या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. "महाराष्ट्रात ज्या प्रकारे क्रॉस वोटिंग झालं, त्याला जबाबदार आपली न्याय व्यवस्था आहे. पक्षांतरबंदी कायद्यातील त्रुटी आहेत. यांच्यावर न्यायालयात अडीच वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेत आहोत. ते कारवाई करत नाहीत. त्यामुळे यांची भीती चेपली आहे. एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं. सरकारमध्ये सामील व्हायचं. एका पक्षाच्या तिकीटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्याने कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं. त्यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली. न्यायालय तारखांवर तारखा देत आहे. महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे, असं न्यायालयाला कितीवेळा सांगितलं आहे. वर्षभरापूर्वी मागच्या सुनावनीत न्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं, तरीही न्यायालयात याबाबत अंतिम सुनावणी होत नाही. हे आपल्या न्याय व्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्देव आहे", असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
पत्रकार परिषदेत राऊत पुढे म्हणाले, केंद्र सरकार संविधान हत्या दिवस साजरा करणार आहे. महाराष्ट्रात जे सरकार सुरु आहे आणि चालवलं जातंय, तीच संविधानाची हत्या आहे. पैशाच्या बळावर ज्याप्रकारे क्रॉस वोटिंग करून घेतलं, ते सुद्धा संविधानाची हत्या आहे. यावर न्यायलय काही करणार आहे का? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना संविधानाची फार चिंता आहे ना, संविधानाची प्रतिष्ठा राहिल, अशाप्रकारचं वर्तन त्यांचं सरकार आणि पक्ष करतोय का? गैरसंविधानिक पद्धतीचं सरकार ते महाराष्ट्रात चालवत आहेत.
केंद्र सरकार, ज्यांना संविधानाची फार चिंता लागली आहे, त्या सरकारला पाठबळ देत आहे. हे या राज्याचं दुर्देव आहे. आम्ही स्वत: त्या ४० आमदारांच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ४० आमदारांविरोधात आहोत. घटनेतल्या संविधानाच्या दहाव्या शेड्युलनुसार आम्हाला न्याय पाहिजे, हे सर्वोच्च न्यायालयाला सांगतोय आणि आम्हाला फक्त तारखा दिल्या जातात. या प्रकरणावर न्यायालयातून जी तारीख आम्हाला मिळत आहे, ती तारीख म्हणजे संविधानाची हत्या आहे, असंही राऊत म्हणाले.