भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संजय राऊत म्हणाले...
पंतप्रधान मोदी यांनी एकतर्फी संवाद साधला आहे. कालच्या सभेत पतंप्रधांनांनी कोरोनासंदर्भातील विषयावर बोलणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी इतर विषयांवर भाष्य केलं. कोविडच्या विषयावरून त्यांनी थेट पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोमणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील (MVA Government) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप नेते आरोपांवर आरोप करत आहेत. तर मविआचे नेते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपवर सुद्धा आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र, असे असतानाच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं (BJP-NCP alliance) सरकार स्थापनेच्या संदर्भात 2017 मध्येच ठरलं होतं असा गौप्यस्फोट शेलारांनी केला आहे.
यावर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीबाबत अफवा असून तेव्हा काय होणार हे मला माहिती आहे आणि उद्या काय होणार हेही मला माहिती असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली.