Sanjay Raut : विश्वजीत कदम नक्कीच वाघ असतील, ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल
सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटले की, तुम्ही महाराष्ट्राचे वाघ असला तरी आम्हीही सांगलीचे वाघ आहोत. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, इकडचा वाघ वेगळा, तिकडचा वाघ वेगळा असं काही नसतं. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील नावाचा वाघ आम्ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि नंतर पाहिलेला आहे. वाघ काय असतो. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार. वाघाची रचना, वाघाचा स्वभाव वेगळा असतो. विश्वजीत कदम नक्कीच वाघ असतील. ते वाघ आहेत की नाहीत हे 4 जूनला कळेल. जर त्यांनी मोठ्या ताकदीने चंद्रहार पाटील यांना विजयी केलं. तर ते नक्कीच वाघ आहेत अशी आम्ही त्यांना पदवी देऊ. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना जर स्वत:ला वाघ सिद्घ करायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रहार पाटील त्यांना विजयी केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून. मग आम्ही 4 जूनला येऊन या वाघांचा सत्कार करु. वाघ हा समोरुन हल्ला करतो. झुडपात बसून वाघ कारस्थान करत नाही. त्यामुळे सांगलीत कोण, किती वाघ आहेत. पण सांगलीतील जनता ही वाघासारखी आहे. ती कोणतीही कारस्थाने किंवा कोणत्याही प्रकारचे डावपेच सहन न करता पैलवान चंद्रहार पाटील यांच्यामागे उभी राहिल.
यासोबतच ते म्हणाले की, काही लोकांचं असे म्हणणे आहे, चंद्रहार पाटील काल भाषणात आपण ऐकलं असेल की, थोडं हे कमी पडतात. काय कमी पडतात? त्यांचे स्वत:चे साखर कारखाने नाही आहेत. साखर कारखाने असले तरी त्यांनी बुडवलेले नाहीत. शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेलं नाहीत. हा त्यांचा कमजोरपणा आहे का? ही त्यांची ताकद आहे. असे अनेक कमजोर उमेदवार अनेक पक्षाने अनेक ठिकाणी उभे केलं आहेत. आम्ही त्यांचा प्रचार करतो आहोत ना. आम्हालाही वाटतं हा कमजोर आहे. पण आम्ही तो कमजोर आहे हे सांगत नाही. आम्हाला माहित आहे आम्ही वाघ आहोत. आम्ही त्याला आमच्याबरोबर पुढे घेऊन जाऊ. आम्ही त्याला विजयी करु. आम्ही नावाचे वाघ नाही आहोत. अनेक ठिकाणी असे उमेदवार आहेत आम्हाला वाटतं ते थोडे कमी पडत आहेत. पण ते कमी पडत असेल तरी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना म्हणून आमची जबाबदारी आहे. त्या उमेदवारांना विजयी करणे. असे राऊत म्हणाले.