राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

राज ठाकरे यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मुरलीधर यांच्या प्रचारासाठी पुण्यात राज ठाकरे यांची सभा होती.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुरलीधर यांच्या प्रचारासाठी पुण्यात राज ठाकरे यांची सभा होती. या सभेत बोलत असताना राज ठाकरे म्हणाले की, आज काय तर म्हणे, मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये, मशिंदीमध्ये फतवे निघत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांना मुसलमान समाजाने मत द्यावी, मदत करावी. अनेक मुसलमान आहेत जे सुज्ञ आहेत त्यांना अक्कल आहे. ते यांच्या वाट्याला जाणार नाहीत. त्यांना समजतंय काय चाललं आहे राजकारण. आता या निवडणुकीच्या तोंडावर फतवं काढलं जात आहेत. काँग्रेसला मतदान करा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करा. मशिंदीमधून हे मौलवी जर फतवे काढत असतील की ह्यांना मतदान करा म्हणून तर आज राज ठाकरे तुम्हाला फतवा काढतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मुरलीधर मोहोळ असतील, भारतीय जनता पार्टीचे, शिंदेंचं, अजित पवार यांचे जे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतांनी मतदान करा. ही अनेक लोकांची जी चुळबूळ सुरू आहे ना काँग्रेसला मतदान करण्याच्या दृष्टीकोनातून हे कशासाठी कारण गेल्या 10 वर्षामध्ये तोंड वरती नाही काढता आलं यांना. असे राज ठाकरे म्हणाले.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, काही नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये संविधान वाचवण्याची फार मोठी लढाई सुरु आहे. या देशातली लोकशाही, या देशातलं स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आलेलं असताना त्याचवेळेला राज ठाकरे यांच्यासारखे नेते महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुहृदयसम्राट यांच्या आत्माला किती यातना होत असतील. याची कल्पनासुद्धा न केलेली बरी.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, ज्या ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या अखंडीतेसाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपल्या संपूर्ण जीवनाचे समर्पण केलं, मराठी माणसाला ताकद दिली. त्याच कुटुंबातली एक व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी चाल करुन येणाऱ्या वृत्तीला मदत करु इच्छित असेल तर मला असं वाटतं प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांचा पवित्र आत्मा अस्वस्थ होईल. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com