Sanjay Raut : अमित शाह यांनी केलेल्या शरद पवारांवरील टीकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut : अमित शाह यांनी केलेल्या शरद पवारांवरील टीकेवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह यांनी म्हटले की, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख आहेत. देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, यांच्या वक्तव्याची चाळण केली पाहिजे. एक हरलेल्या आणि घाबरलेल्या नेत्याचे हे वक्तव्य आहे. खरं म्हणजे मला कीव येते. व्यासपीठावर पुण्यात त्यांच्याबरोबर लोक बसले होते आणि समोर जे होते. त्यांनी माननीय शरद पवार यांच्यासंदर्भात जे वक्तव्य अमित शाह यांनी केलं त्याच्यावर टाळ्या वाजवल्या. मला त्या सर्व मराठी श्रोत्यांची कीव येते. इतकी लाचारी, इतका निर्लज्जपणा. गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेलं पवार ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये वक्तव्य करुन निघून जातो. हा महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली ही उकळी आहे.

माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले. ते ज्यांच्यामुळे केलं ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शाहांच्या मांडीला मांडी लावून बसतात. या सगळ्यांमुळे माननीय शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत हे अमित शाहांना माहित नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाण बसले होते. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप अमित शाह यांनी केला आहे. माननीय शरद पवारांना मोदी सरकारने देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण दिला. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल आणि खुद्द मोदींनी त्याचं कौतुक केलं आहे. पवार साहेबांचे बोट धरुन आम्ही आलो राजकारणात अशी वक्तव्य केली. मला वाटतं मोदी आणि शाहांमध्ये काहीतरी भांडण झालेलं दिसतंय, मतभेद झालेलं दिसत आहेत.

यासोबतच राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा अमित शाह यांनी शरद पवारांवर आरोप केले. माननीय उद्धवजी यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे प्रमुख म्हटले. तरी या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला. गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही. या संदेश लोकसभेच्या निकालाने अमित शाह यांना दिला आहे. त्याचा आक्रोश ते आता करत आहेत. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील हे दोन या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या सन्माननीय व्यक्ती आहेत. भारतीय जनता पक्षासारखा खोटारडेपणाच्या मशीन लावून आम्ही काम करत नाही. आम्हाला जनतेनं स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलं आहे. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com