Sanjay Raut : राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मनची बात ऐकत आहेत तर काही लोक फक्त आपली मन की बात सांगतात
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत चांदवड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यामध्ये संजय राऊत यांनी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये राहुल गांधी भारत जोडो यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये पोहचले आहेत. मी राहुल गांधी यांच्यासोबत काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत चाललो होतो. हा नेता देश जोडण्यासाठी या देशामध्ये चालतो आहे. राहुल गांधी आपल्या सर्वांचे नेते. राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मनची बात ऐकत आहेत. काही लोक फक्त आपली मन की बात सांगतात. मुंबईमध्ये राहुल गांधी यांचे भव्य स्वागत केलं जाईल. या देशामध्ये मोदींसाठी, अमित शाहांसाठी भाड्याने लोक आणली जातात. भारत जोडो न्याय यात्रेत चालण्यासाठी, सभेसाठी भाड्याने लोक आणलेली नाहीत. लोक स्वत:हून येत आहेत.
चांदवड ही कांदानगरी आहे. पण या कांद्याने शेतकऱ्यांना आज पूर्ण रडवलं आहे. या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राज्यात गद्दार आमदार आणि खासदाराला भाव मिळतो. मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. दोन कोटी लोकांना रोजगार ही मोदींची गॅरंटी पण कांद्याच्या संबंधित अनेक लोक बेरोजगार झाले आहे.मोदी नाशकात आले तेव्हा कांदा आंदोलकांना नजरकैदेत ठेवले गेले. आज जवान आणि किसान यांची अवस्था वाईट झाली आहे. ही मोदींची गॅरंटी झाली आहे. राहुल गांधी संघर्ष करत आहेत. या यात्रेत सहभागी झाले पाहिजे. हुकुमशाही विरोधात संघर्ष सुरू आहे यात सगळ्यांचे योगदान मिळाले पाहिजे.
काही लोकांनी कंपन्या स्थापन केल्या त्याचे मूळ गुजरातमध्ये आहे. या देशामध्ये सध्या एकच गॅरंटी आहे मोदींची की फक्त आम्हीच खाऊ शेतकऱ्याला खाऊ देणार नाही. या यात्रेला जसा प्रतिसाद मिळतोय ते पाहून लक्षात येत की परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. मोदी हे निवडून येणारं नाही ही या यात्रेची गॅरंटी आहे. मोदी तो गया. यात महाविकास आघाडी सोबत आहे. असे राऊत म्हणाले.