देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही; मोर्चाला परवानगी मिळाली नसल्याने संजय राऊत संतापले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेली वक्तव्ये तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होणारी वक्तव्ये यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पण अद्याप या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील विषय फार गंभीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारख्या दैवतांचा जो अपमान घटनाकत्मक पदावर बसलेला व्यक्ती खुलेआम करतात आणि त्याचं समर्थन सरकार करत आहे. याविरोधात मोर्चा काढू नये का?,”असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच “कर्नाटकचे आणि राज्याचे मुख्यमंत्री भेटले असले तरी सीमाभागात तणाव आहे. आम्ही फार टोकाची भूमिका घेणार नाही. पण तोही मुद्दा लोकासोर येणं गरजेचं आहे. अशा अनेक मुद्द्यावंर आम्ही मोर्चा काढू. आम्ही महाराष्ट्राचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू. हा जनतेचा मोर्चा असून, जनता या मोर्चात उतरेल. आम्ही फक्त या मोर्चाचं नेतृत्व करत आहोत. आमच्या या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही,” असे ते म्हणाले.
“या देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. लोकशाहीत लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे,” “मोर्चा काढू नये असं वाटत होतं तर राज्यपालांना हटवायला हवं होतं. छत्रपतींचा अपमान कऱणाऱ्या तुमच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांवर कारवाई करायला हवी होती. केली नसल्याने आम्ही मोर्चा काढणारच,” असा थेट इशाराचा राऊत यांनी दिला आहे.