काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील - संजय राऊत
मुंबई महापालिकेतील कार्यालयावर ताबा घेतल्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना भवन ताब्यात घेण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. आज नागपुरातील रेशीमबाग इथल्या डॉ. हेडगेवार स्मृतीभवन इथे आदरांजली वाहिली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केलं. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, पालिकेत शिवसेनेचं पूर्ण बहुमत आहे. एकसंघ पक्ष आहे. सर्व नगरसेवक पालिकेत जातील. सर्व पक्ष कार्यालयांना सील महापालिका प्रशासनाने सील लावल्याचं कळलं. कोणत्या कायद्याने? नोटीस का नाही दिली?. ही मनमानी आहे. लोकशाहीचा खून प्रत्येक लहानमोठ्या मंदिरात पाडत आहात. या राज्यात लोकशाही आहे की नाही? मुख्यमंत्री काही सूत्रे हलवत असतील तर त्यांनी काळजीपूर्वक पावलं टाकावीत. एक दिवस भाजपवाले तुमच्या मुख्यमंत्री कार्यालयात घुसतील तर ते तुम्हाला कळणारही नाही. गद्दारांविषयी बोलूच नका. ते कुठेही घुसतात.असे राऊत म्हणाले.
तसेच संघ विचारांचा रेशमी कीडा हा त्यांच्या कानात वळवळत आहे. काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी आणि हाफ पॅंट घालून येतील एवढ्या लवकर बदल होईल असं वाटलं नव्हतं. शिवसेना भवन हे बाळासाहेबांचं आहे, इथे कोणाचा बाप येऊ शकत नाही. शिवसेना भवन सर्वाचं आहे. नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन यायचे आता त्यांनी काही बोलायचा अधिकार नाही. असे म्हणत राऊत यांनी मुखमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.